टपाल विभागाच्या कामांचा विद्यार्थ्यांकडून आढावा

| पनवेल । वार्ताहर ।

लहानपणी फोन नसल्यामुळे संपर्क साधण्याचे एकमेव साधन म्हणजे पत्र. खेड्यापाड्यात पोस्टमन पत्र घेऊन आला की त्याचे अप्रूप असायचे. आजच्या डिजिटल युगात मोबाईलमुळे मुलांना पत्र म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे टपाल विभागाच्या कामकाजाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने मंगळवारी नवीन पनवेलच्या मुख्य टपाल विभागातील माहितीपर उपक्रम राबवण्यात आला.

भारतीय डाक विभागाची स्थापना 9 ऑक्टोबर 1854 साली झाली. याच अनुषंगाने 9 ते 14 ऑक्टोबरदरम्यान पोस्टल आठवडा म्हणून पाळण्यात येत आहे. या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या कामकाजाची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच टपाल विभागाच्या बचत योजना, रजिस्टर, स्पीडपोस्ट अशा विविध सेवांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून दिले जात आहे. याशिवाय पोस्टाचे पत्र, आंतरदेशीय पत्र, पाकीट व तिकिटाचे प्रदर्शनही नवीन पनवेलच्या मुख्य कार्यालयात मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाला डी. डी. विसपुते शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी टपाल विभागाबाबतची सर्व माहिती या मुलांना देण्यात आली.

अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, हा आमचा उद्देश असतो. दरवर्षी टपाल दिन साजरा केला जातो. मुले त्या विषयावर भाषण करतात, पण प्रत्यक्ष तेथील कारभाराची त्यांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना टपाल विभागाची माहिती मिळावी, म्हणून हा प्रयत्न होता.

अस्मिता ठाकूर
शिक्षिका
Exit mobile version