सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

पेणजवळील पाटणेश्वर अंतोराकडे जाणाऱ्या पुलाला गळती; निकृष्ट कामाचा आरोप, पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!

| पेण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्ग आणि त्रुटींचं जणू समीकरणच होऊन बसलं आहे. गेल्या तब्बल सतरा वर्षांपासून महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता नवनव्या समस्या रोज समोर येत आहेत. पेण शहरालगत पाटणेश्वर अंतोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाला चक्क गळती लागल्याचे दिसून आल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुलाला गळती लागणे म्हणजे केवळ किरकोळ बाब नसून पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि त्याची भविष्यातील सुरक्षितता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. पूल नेमका कशामुळे गळत आहे? बांधकामात कोणत्या त्रुटी राहिल्या? वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? असे अनेक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या पुलावरून पाटणेश्वर, अंतोरा, नवघर, सापोली, बेडे, वरेडी यांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. पेण शहराच्या पलीकडे असलेले श्रीक्षेत्र पाटणेश्वर, म्हात्रे रुग्णालय तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून हजारो नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित आहे.

आज पुलाला गळतीः उद्या त्याची अवस्था आणखी गंभीर झाली तर? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पुलाच्या संरचनेची तातडीने तांत्रिक तपासणी करून त्याची सुरक्षितता स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सतरा वर्षे उलटूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्या संपत नसतील, तर या कामाच्या गुणवत्तेचे आणि देखभालीचे ऑडिट कधी होणार? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार तरी कधी? गळती लागलेल्या या पुलाची संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि पुलाच्या स्ट्रक्चरल सेफ्टीबाबत अधिकृत अहवाल जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version