जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; ऐन गणेशोत्सवात खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील सर्व घटकांचा विकास साधण्याचा दावा जिल्हा परिषदेकडून कायमच केला जातो. प्रत्यक्षात मात्र हा दावा फेल ठरत असल्याचे दिसून आले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने-दिवीवाडी हा एक किलो मीटरचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवास खड्ड्यातून होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागांचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद ही स्वतंत्र संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वैयक्तीक व सार्वजनिक योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात दोन हजारपेक्षा गावे,वाड्यांचा समावेश आहे. या वाड्या व गावांचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे केली जातात. अलिबाग तालुक्यातील महाजनेमधील दिवीवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आदीवासी समाज आहे. या वाडीकडे जाणारा रस्ता गेल्या चार वर्षापासून खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवापुर्वी खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, बांधकाम विभागाने या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात खड्डयातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांसह भक्तांवर आली आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हा रस्ता गायब झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप निर्माण झाला आहे.
महाजने ते दिवीवाडी रस्ता पुर्णतःखराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता गायबच झाल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षापासून या रस्त्याची दुरुस्तीच केली नाही. त्यामुळे खड्डयातून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
रघुनाथ नाईक
सामाजिक कार्यकर्ते






