स्थानकात स्वच्छतेचा दिखावा

कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| रायगड | प्रमोद जाधव |

बसेस वेळेवर न लागणे, बसेसमध्ये सतत बिघाड होणे, सीएनजी भरण्यास विलंब होणे अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अलिबाग एसटी स्थानक सापडले आहे. या समस्यांमध्ये अस्वच्छतेची भर पडली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा ढिगारा साचलेला आहे. स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा असताना, स्थानकात स्वच्छतेचा दिखावा असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

अलिबाग स्थानकातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानकातून बसेस वेळेवर सुटत नाही. तासनतास बससाठी वाट पहाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. रस्त्यात बस बंद पडणे, सीएनजी भरण्यासाठी विलंब लागत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहवे लागत आहे. या प्रकारामुळे प्रवाशी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अलिबाग स्थानकातील गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही समस्या असताना स्थानकात कचऱ्याचा ढिगारा साचत असल्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. ज्या ठिकाणी बसेस थांबल्या जातात. त्याच ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा दिसून येत आहे. प्रवासी वर्गांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अलिबाग स्थानकात 60हून अधिक बसेस आहेत. अडीचशेहून अधिक कर्मचारी असून महिन्याला एसटीतून महिन्याला सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अलिबागमधून हजारो प्रवासी करतात. मुंबईसह पुणे, अक्कलकोट, रोहा, बोरीवली, ठाणे, अशा अनेक मार्गावरील प्रवाशांना सेवा देण्याचे काम केले जाते. मात्र, स्थानकातील कचऱ्यामुळे स्थानकातील भोंगळ कारभार उघड होत आहे. या कारभाराविरोधात प्रवासी वर्गामध्ये संताप निर्माण झाला आहे.

स्वच्छतेचा ठेका फक्त नावापुरता
अलिबाग स्थानकातील स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदारामार्फत स्थानकाती ल स्वच्छता राखली जाते. मात्र, ही स्वच्छता फक्त कागदावर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. स्थानकाच्या आवारात प्लास्टीक व इतर कचऱ्याचा ढीगारा असल्याने प्रवाशांना नाक दाबून या मार्गातून ये-जा करावी लागत आहे.

स्थानकातील कचरा काढण्याबरोबरच विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. स्थानकात असलेल्या कचऱ्याबाबत संबंधितांना सुचना केली आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

राकेश देवरे
आगार व्यवस्थापक

Exit mobile version