नागरिकांकडून ‘कृषीवल’चे आभार व्यक्त
| कोलाड | प्रतिनिधी |
आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. परंतु, त्या ठिकाणी या केंद्राकडे जाण्यासाठी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने रूग्णांना हे केंद्र शोधताना मोठी धावपळ करावी लागत होती. याबाबतची बातमी ‘कृषीवल’ने प्रसिद्ध करताच संबंधित प्रशासनाला जागील आली असून, त्यांनी केंद्राचे नाव दर्शविणारा फलक लावला. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय दूर झाली असून, असंख्य नागरिकांनी ‘कृषीवल’चे आभार मानले आहेत.
आंबेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिर्णावस्थेत असल्याने तिच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. त्यासाठी या इमारतीतील केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. हे नवीन केंद्र कोलाड-रोहा रस्त्यावरील मराठा पॅलेस समोर सुरू करण्यात आले आहे. पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणाची परिसरातील नागरिकांना माहिती होती. परंतु, हे केंद्र नवीन ठिकाणी आरोग्य केंद्र असल्याचे दिशा दर्शविणारा नामफलक अथवा दिशादर्शक फलक नसल्याने परिसरातील रूग्णांची मोठी गैरसोय होत होती. प्रथमच येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्र शोधण्यासाठी चौकशी करत जावे लागत होते. तसेच, अपघातग्रस्त नागरिकांना आरोग्य केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागत होती. त्याची बातमी ‘कृषीवल’ने प्रकाशित केली आणि त्याची दखल संबंधितानकडून घेण्यात येऊन दिशादर्शक फलक लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय दूर झाली आहे.






