डिझेल तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक !
40 टन डिझेलसह चौघे ताब्यात; सूत्रधार विकी फरार !!
| उरण | वार्ताहर |
भर समुद्रात सहा तासांचा थरारक पाठलाग करीत डिझेल तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कस्टर विभागाला यश आले असून,या प्रकरणी चौघाजणांना अटक करण्यात आली आहे.मात्र त्यांचा म्होरक्या विकी फरार झाला आहे. कस्टमचे उपायुक्त श्रीधर धुमाळ यांना मिळालेल्या खबरी नुसार कस्टम चे आयुक्त राजेश सानन यांच्या मार्गदर्शनाखाली थरारक पाठलागाने कस्टमच्या टीमने भर समुद्रात चालणार्या डिझेल तस्करी विरोधात सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा 40 टन डिझेल साठा कस्टमच्या टीमने पकडला आहे. या डिझेल तस्करी कामी वापरण्यात आलेली आय एन डी एम एच 1 एम एम 94 या क्रमांकाची साई दत्तगुरू माऊली नावाची सुमारे 35 लाख रुपये किंमतीची मासेमार नौका देखील कस्टमकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईच्या निमित्ताने प्रेमचंद कोळी,अवधूत कोळी, संतोष कोळी आणि अंकुश यांना कस्टमने ताब्यात घेतले असून त्यांचा डिझेल तस्करी धंद्याचा मास्टरमाईंड विकी मात्र फरार असून त्याचा कस्टमकडून कसून शोध घेतला जात आहे.
या कारवाईत पकडला गेलेला डिझेल साठा नक्की कोणासाठी आणि कुठून आणला होता याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती कस्टमचे आयुक्त राजेश सानन यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. या नौकेत असलेल्या मोठमोठ्या टाक्यांमध्ये सुमारे 40 टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरील डिझेल आढळून आले आहे ज्याची भारतीय बाजारातील किंमत सुमारे 20 ते 25 लाख रुपये एवढी आहे.