चकाचक रस्त्याला गतिरोधकांची मागणी

वेगवान वाहनांची गती रोखण्याची गरज

| दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन हे नेहमीच गजबजलेले शहर. मात्र, या शहरात नवीन डांबरीकरण रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे या चकाचक रस्त्याला तातडीने गतीरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील 28 किलोमीटर अंतरातील रस्त्यांची मागील तीन महिने कालावधीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती होत आहे. त्यामुळे रस्ते सुस्थितीत झाल्याने अनेक वहांनासोबत काही धूम स्टाईल ने बाईक चालविणार्‍यांचा नाहक त्रास पादचार्‍यांना सहन करावा लागत आहे.

बोर्लीपंचतनमध्ये दिघी, दिवेआगर, दांडगुरी तसेच पंचक्रोशीतील गावांतील रहिवाशी खरेदी साठी येतात. शिवाय श्रीवर्धन, दिघी व दिवेआगर या पर्यटन स्थळीं जाण्यासाठी बोर्ली शहरातून जावे लागते. याशिवाय व्यावसायिक शिक्षण संस्था, मराठी शाळा, पदवी कॉलेज या शहरात असल्याने विद्यार्थींची वर्दळ हि शहराच्या मार्गावर असते.

बोर्लीशहराच्या सुरुवातीला बोर्ली बसस्थानक ते दिवेआगर या दीड ते दोन किलोमीटरचे अंतर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ सुरू असते. अशातच काहींना घाईगडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात शहराच्या मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहणांना ओव्हरटेक करण्याचे सुचते. परंतु या मार्गावर एक ही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. तसेच रस्ता ओलांडणार्‍या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे. या पाश्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी सबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे. त्यामुळे अपघातांना आळा बसेल अशी आशा नागरकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version