| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलसमोरील रस्त्यावर मंगळवारी भीषण अपघात झाला. यावेळी रस्त्यावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने एका दुचाकीला जोरात धडक दिली. तेव्हा दुचाकी डंपरखाली आली आणि त्यावर बसलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही मुलगी सकाळी आपल्या वडिलांसोबत सेंट झेवियर्स शाळेत जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यावरुन जाताना त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बाईकवर पाठीमागे बसलेल्या मुलीच्या अंगातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे मुलीने जागेवरच प्राण सोडले. या अपघातामध्ये तिच्या वडिलांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ते कितीतरी वेळ मुलीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रस्त्यावरच बसून होते. यावेळी आजुबाजूला बघ्यांची गर्दी झाली होती. काहीवेळानंतर मुलीच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डंपर चालकाला अटक केली आहे. अपघाताचा अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे चिमुरडीच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.