| थायलंड | वृत्तसंस्था |
मंगळवारी (दि.1) दुपारी मनला सून्न करणारी बातमी समोर आली आहे. बँगकॉक, थायलंड येथे एका शाळेच्या बसने पेट घेतला आणि यात 44 विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त एपी या एजन्सीने दिली आहे. एपी न्यूज एजन्सीने एका सरकारी अधिकाऱ्याचा अहवाल देताना 25 जणं दगावल्याचे वृत्त दिले आहे. 16 विद्यार्थी व 3 शिक्षकांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. परिवहन मंत्री सरिया जुआंगरूंगरुंगकित यांनी ही माहिती देताना घटनेची चौकशी केली जाईल, असे सांगितले. राजधानीच्या उत्तरेकडील उपनगरातील पाथुम थानी प्रांतात दुपारच्या सुमारास या बसला आग लागली. मध्य उथाई थानी प्रांतातून 44 जणांना घेऊन शाळेच्या सहलीसाठी ही बस अयुथयाकडे जात होती. तेव्हा ही आग लागली. प्रवाशांपैकी कोणाचाही मृत्यू झाला आहे, की नाही याची पोलिसांनी तात्काळ पुष्टी केली नाही. पण, गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, वाचलेल्यांच्या संख्येनुसार 25 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या बसला लागलेली आग किती गंभीर होती, हे दिसते. संपूर्ण बस आगीत जळून खाक झाल्याचे दिसत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मंत्री चर्नविराकुल यांनीही सांगितले की, बचावकर्ते सुरक्षितपणे आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बस अजूनही खूप गरम आहे. आग विझवल्यानंतर काही मृतदेह बसमध्येच आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक टायर फुटल्यानंतर बस बॅरियर्सवर आदळली आणि त्यानंतर आग लागली.