32 जिल्ह्यांतील खेळाडूंचा सहभाग
। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य टेनिसबॉल क्रिकेट संघटना व नंदुरबार टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23 वी महाराष्ट्र राज्य कनिष्ट गट मुले-मुली टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. चार दिवसांपासून सुरू असलेल्या अटी-तटीच्या लढतीत अंतिम सामना रायगड विरुद्ध धुळे यांच्यात खेळवला गेला. यामध्ये रायगड संघ अंतिम विजयी ठरला आहे.
रायगडचा पहिला सामना हा धुळे संघासोबत झाला. यावेळी रायगड संघाने 13 धावांनी धुळे जिल्ह्यावर विजय मिळवला. रायगडचा दुसरा सामना परभणी संघासोबत झाला. यावेळी रायगड ने 24 धावांनी विजय मिळविला. तिसरा सामना नंदुरबार संघासोबत झाला. यात रायगड संघाने 3 धावांनी विजय मिळविला. यानंतर अंतिम 16 मध्ये रायगडचा सामना नाशिक संघासोबत झाला. यावेळी रायगडने नाशिक संघाला 5 षटाकांत 20 धावांवर रोखून ते आव्हान फक्त 2 षटकांत एकही गडी न गमवता पूर्ण केले. आणि अंतिम 8 मध्ये दिमाखात प्रवेश मिळवला. यावेळी रायगड व सोलापूर यांच्यात सामना झाला. रायगडने सोलापूर संघाला 5 षटकांत 55 धावांचे आव्हान दिले होते. परंतु, सोलापूरची बारी 31 धावांवर आटोपली. रायगडने 23 धावांनी पराभव करत आपले वर्चस्व कायम ठेवले. यावेळी रायगड संघाने सलग पाच सामने जिंकले व उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत रायगडचा सामना ठाणे संघासोबत झाला. यावेळी ठाणे संघाने रायगडला 5 षटकांत 27 धावांचे आव्हान दिले होते. रायगड संघाने हे आव्हान फक्त 2 षटकांत पूर्ण करून मोठ्या दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या टेनिसबॉल क्रिकेट सामन्यातील अंतिम सामना रायगड व धुळे यांच्यात झाला. यावेळी धुळे संघाने रायगडला 50 धावांचे लक्ष दिले होते. लक्षाचा पाठलाग करताना रायगड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकांत 50 धावा ठोकून विजय संपादित करून प्रथम विजेतेपद पटकावले. तर, उपविजेतेपदाला धुळे संघाला समाधान मानावे लागले असून तृतीय स्थान ठाणे संघाने मिळविले आहे. तसेच, मुलींमध्ये विजेतपद नाशिक, उपविजेतेपद नागपूर तर तृतीय स्थान धुळे संघाने मिळविल आहे.
विजेतपद पटकावलेले रायगडचे खेळाडू राज बामुगडे, अश्मन म्हात्रे, कुणाल पाटील, ऋग्वेद मोरे, संस्कार देशमुख, कुणाल पाटील, हार्दिक म्हात्रे, आयुष दिघे, सुयश वाघमारे, विघ्नेश थिटे, विराज म्हात्रे, आयुष मनवे, पार्थ कोळी, सिद्धांत गुरव तर प्रशिक्षक म्हणून महेश म्हात्रे, भरत गुरव व व्यवस्थापक म्हणून जयदीप पाटील याांनी काम पाहिले आहे.
या स्पर्धेत गुणवंत फलंदाज हा किताब राज रोशन (रायगड) या खेळाडूने पटकावले तर मुलींमध्ये संस्कृती (नागपूर) यांना देण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब अनिकेत बोर्डे (अहमदनगर) व कोमल बडगुजर (धुळे) यांना देण्यात आला. तर, अष्टपैलू हा किताब विनोद शिंदे (धुळे) व धनश्री काकड (नाशिक) यांना देऊन सन्मानित करण्यात आले.