। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकासमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. 5 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात रायगड जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.5) सकाळी दहा वाजता लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लायन्स क्लब ऑफ पनवेलचे सेक्रेटरी अशोक गिल्डा, खजिनदार मनोज म्हात्रे, प्राजेक्ट चेअरमन राजेंद्र जेसवानी, संजय पोतदार, नागेश देशमाने, नंदकिशोर ध्रोत्रे, के.एस. पाटील, मधुकर भगत, मदन गोवारी, हेमंत ठाकुर, गौतम म्हस्के, सुयोग पेंडसे तसेच माजी लायन अध्यक्षा मीना पोतदार, ज्योती देशमाने, भावना जेसवानी, शोभा गिल्डा, लायन सभासद आणि लिओ क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष व सभासद मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.
तसेच, पुणे बालेवाडी येथे दि. 6 ते 10 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी संघ निवडतांना या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा विचार केला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच, विजयी व उपविजयी स्पर्धकांना चषक, रोख रक्कम आणि गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.