अॅड. राकेश पाटील यांचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील विविध रस्त्यांची दैना उडाली आहे. विशेष म्हणजे, फणसापूर ते चौल-गायचोळे या सात किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सुमारे 23 गावांतील नागिरक याच रस्त्याचा वापर करतात. परंतु, रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यावसायिक यांचे अतोनात हाल सुरु आहेत. तब्बल 20 वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबर टाकण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने ढुंकूनही पाहिले नाही. हा रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना सोमवारी दिले.
रस्त्याची अवस्था दयनिय झाल्याने या रस्त्यावरून कुदे, सुडकोळी, नवखार, भागवाडी, भोनंग, नवघर, महान, मोरोंडे, उमटे, रामराज तसचे रामराज विभागातील सात ते आठ आदिवासीवाड्या, बोरघर, ताजपूर, मोरखोल, भिलजी, फणसापूर, बापळे, दिवी पारंगी, चिंचोटी, फुडेवाडी, चौल कातळपाडा, वलवली, वलवली आदिवासीवाडी अशा सुमारे 23 गावांतील नागरिक ये-जा करतात. त्यांचा रोजचा हा रहदारीचा रस्ता आहे. या सर्व गावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी रेवदंडा कॉलेजला याच रस्त्याने जातात. चौल व रेवदंडा या ऐतिहासिक शहरांना याच रस्त्याने जोडण्यात आलेले आहे. कमी कालावधीच या ठिकाणी जाता येते. आग्राव कोळी वाड्यातील कोळी महिलांना मासे विक्रीसाठी ग्रामीण भागात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र, तो रस्ताही शेवटच्या घटिका मोजत आहे. या ग्रामीण भागांतील नागरिकांचे हातावर पोट आहे. शेती आणि मासेमारी तसेच दुग्ध व्यवसाय करणे हा येथील नागरिकांचा व्यवसाय आहे. या विभागातील नागरिकांसाठी शेती, शिक्षणासाठी जवळची बाजारपेठ म्हणून चौल-रेवदंडाची बाजारपेठ आहे. उदरनिर्वाहासाठी तसेच जे मोलमजुरी, मासेमारी, दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, ते सध्याच्या स्थितीमध्ये या रस्त्यावरून जाऊच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वी हा रस्ता 20 मीटर रूंदीचा होता. आता रस्ता जेमतेम दोन मीटरचा राहिला आहे. सदरच्या रस्त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. इ.स. पूर्व चौलचे बंदर हे आंतरराष्ट्रीय बंदर होते. त्यावेळी चौलच्या बंदरामध्ये परदेशात माल पाठविण्यासाठीही रोह्यावरून आणलेल्या मालाची याच रस्त्यावरून ने-आण केली जायची. या विभागातील 23 गावांतील नागरिकांना त्यांच्या शेती व शेतीपूरक व्यवसायांना गती देणारा हा एकमेव रस्ता आहे. सदरचा रस्ता नसल्यामुळे वावेवरून वळसा मारून जावे लागत असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे.
गावांतील लोकांची आर्थिक उलाढाल घडवून आणणारी चौल भोवाळे येथील दत्ताची यात्रा डिसेंबरमध्ये पाच दिवस भरते. या यात्रेमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. परंतु, सदरचा रस्ताच नसल्यामुळे येथील नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. अनेक विद्यार्थी रेवदंडा कॉलेजला जाण्यापासून वंचित राहात आहेत.
आमचा रस्ता कोठे आहे?
सद्यःस्थितीत विद्यमान सरकारने 17 हजार ग्रामीण भागातील रस्ते मार्गी लावल्याची जाहिरात टीव्हीवर झळकते. मग, या 17 हजार रस्त्यामध्ये आमचा रस्ता कोठे आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रूपायांचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यासांठी खर्च केला जातो. मात्र, मागील वीस वर्षांपासून डांबरीकरणापासून हा रस्ता वंचित आहे. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी या रस्त्याच्या कामास मंजुरी द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.