। अलिबाग । प्रतिनिधी ।
अधिकारी तसेच कर्मचार्यांच्या बदली संदर्भातील फायली जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहीनेच पूर्ण होतात. त्यामुळे अशा महत्वाच्या फायली त्यांच्याकडे निर्धारीत वेळेत आल्या नाही, तर त्या मागवण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यानुसारच काही दिवसांपूर्वी आरोग्य विभातील बदलींच्या फायली त्यांनी त्यांच्याकेड मागवल्या होत्या. याबाबत पुन्हा फाईली साठवून ठेऊ नका, अशा तोंडी सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या अखत्यारित काम करणार्या तीन तालुका आरोग्य अधिकारी यांची बदली करण्यात आली होती. त्यामध्ये पनवेलच्या तालुका अधिकार्यांना पेण व पेणच्या तालुका अधिकार्यांना पनवेलमध्ये तसेच तिसर्या तालुका अधिकार्याची अन्य ठिकाणी बदली करण्याबाबत कार्यवाही सुरु होती. या बदलीमध्ये खुद्द जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या नातेवाईकांचादेखील समावेश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात बदलीची फाईल होती. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी चार दिवसापूर्वी बदलीची फाईल मागविली असल्याचे सांगितले. अशा फाईली ठेऊ नका, अशा तोंडी सूचना संबंधीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा असा प्रकार करू नका, अशी सक्त सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी आरोग्य अधिकार्यांना तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी आता कोणत्याही विभागाकडे कोणत्याही कामाची फाईल मागवू शकतात. या भीतीने अन्य अधिकारी आता सतर्क झाले आहेत. साहेब कधी ही फाईल मागवतील. यासाठी ती वेळेत परिपूर्ण करुन ठेवणे आणि त्यावर उचित कार्यवाही करण्याकडे सर्वच अधिकार्यांचा कल असल्याचे दिसून येते. दरम्यान, कोणत्याही व्यक्तीचे काम अडकून राहू नये, ते वेळेत हाता वेगळे व्हावे, असा हेतू डॉ. बास्टेवाड यांचा चूकीचा नाही. त्यामुळे यंत्रणांना एक शिस्त तर लागेलच शिवाय कोणालाही कामासाठी तात्कळत बसावे लागणार नाही.