आरोग्य विभागाचा कारभार सुरळीत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आरोग्य विभागाने कोणतीही बदलीची फाईल आडवलेली नाही, अथवा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सुधारण्याची संधी देण्याबाबत कारवाई थांबवली, असे काहीच घडलेले नाही. आरोग्य विभागाचा कारभार हा सुरळीत सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या कार्यमुक्तीच्या फाईल माझ्याकडे शक्रवारी 20 सप्टेंबर 24 रोजी संध्याकाळी सादर झाल्या होत्या. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार, रविवारी सार्वजनिक सुट्टी होती. 23 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयात भरती प्रक्रियेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु होते. तसेच दुपारी 4 ते साडेसहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी जावे लागले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी तब्येत बरी नसल्याने मी एक दिवसाची किरकोळ रजा घेतल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. याबाबत मोबाईलद्वारे मुख्यकार्य अधिकारी यांना कल्पना दिली होती. त्यामुळे संबंधीत कार्यमुक्तीच्या फाईल रोखल्या नव्हत्या.
मुख्यकार्य अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कार्यमुक्तीच्या फाईलबाबत विचारले असता उद्या सादर करणार, असे त्यांना सांगितल्याचेही डॉ. विखे यांनी सांगितले. साथीच्या सर्व्हेक्षण व नियंत्रण करणे याची जबाबदारी आमची नसून ती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचीच आहे, असेही डॉ.विखे यांनी स्पष्ट केले.