कृषीवल टीमकडूनन तालुक्यातील 34 दुकानांमध्ये पडताळणी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबाग व उरण तालुक्यात शंभर टक्के आनंदाचा शिधा पोहोचला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. याबाबत कृषीवल टीमने पडताळणी केली असता वेगळेच चित्र दिसून आले. अलिबाग तालुक्यात रवा, साखर, मैदा वगळता आनंदाच्या शिधा कीटमध्ये 12 हजार सोयाबीन तेल कमी असल्याची माहिती समोर आली असून, 34 दुकानांपर्यंत शिधा पोहोचलाच नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे पुरवठा अधिकार्यांचा शंभर टक्केचा दावा खोटा ठरला आहे.
अलिबाग तालुक्यात आनंदाचा शिधा घेणारे 40 हजार लाभार्थी आहेत. 97 दुकानांमार्फत हा शिधा दिला जाणार आहे. गणेशोत्सवात मिळणारा शिधा तालुक्यातील अलिबाग व पोयनाड येथील गोदामातून दुकानांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध झाला. त्यात साखर 40 हजार, रवा चाळीस हजार, मैदा चाळीस हजार व सोयाबीन तेल 28 हजार इतके जिन्नस प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील 97 दुकानांपैकी 63 दुकानांमध्ये हा शिधा पोहोचला आहे. उर्वरित 34 दुकानांमध्ये शिधा देणे शिल्लक राहिले आहे. त्यामध्ये 12 हजार सोयाबीन तेल येणे शिल्लक राहिले आहे.
नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्याशी आनंदाच्या शिधाबाबत माहिती घेण्यात आली. त्यांनी आनंदाचा शिधा उरण व अलिबाग तालुक्यात शंभर टक्के पोहोचला असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र शंभर टक्के शिधा तालुक्याला प्राप्त झालाच नसल्याचे समोर येत आहे. रवा, साखर, मैदा, सोयाबीन तेल या चार जिन्नसमधील सोयाबीन तेलाचे जिन्नस अपूर्णच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चुकीची माहिती देऊन जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न यातून केल्याचे दिसून येत आहे.
अजून किती दिवस शिधाधारकांना प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनामार्फत निवडण्यात आलेल्या ठेकेदाराकडून आनंदाच्या शिधाचे जिन्नस शंभर टक्के येत नसल्याने ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे कठीण होऊन बसले आहे. तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी कार्यालयालासह तालुक्यातील रास्त भाव दुकानांनादेखील शिधाधारकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.