| नवी मुंबई | प्रतिनिधी |
उरण फाटा-किल्ला जंक्शनदरम्यान जेएनपीएच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविवारी (दि.20) रात्री दोन वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून या बालकाचा मृत्यू झाला असून आजान मोहम्मद दानिश असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात त्याचे आई-वडील आणि पाचवर्षीय बहीणही जखमी झाले आहेत. अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रेलरचालक विशाल राजभर याला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरणमधील करळ फाटा येथे राहणारे मोहम्मद दानीश (26) हे पत्नी नाजीयाबानो (26), झिनत (5) आणि आजान यांच्यासह रविवारी नातेवाइकांकडे गेले होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते घरी परतत असताना जेएनपीएच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने उरण फाटा-किल्ला जंक्शनदरम्यान धडक दिली. यात चौघेही खाली पडले. यात आजान हा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नाजीयाबानो गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोहम्मद आणि झिनत हे किरकोळ जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा मृत्यू
