। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेच्यावतीने स्वच्छतेचा संदेश नागरिकांच्या मनात रुजवण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जात आहे. याच अनुषंगाने महापालिकेने शहरातील मुख्य भिंतींवर आकर्षक रंगसंगतीमधून काढलेल्या चित्रांमधून स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविताना महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. यात आकर्षक देखावे, मुलांचे आवडते कार्टून-आवडते कलाकार अशा विविध माध्यमांतून दिघा ते बेलापूर अशा सर्वच विभागांत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. या चित्रांमधून नागरिकांना स्वच्छतेची जाणीव करून देणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी त्या-त्या विभागातील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी देखील पुढाकार घेत असून दरवर्षी नवनवीन संकल्पनांमधून नवी मुंबईचे रूप अधिक आकर्षक व लक्षवेधी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणार्या चित्ररूप बोलक्या भिंती आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
लोकसहभागामुळे प्रोत्साहन
या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा, तसेच स्वच्छता ही नागरिकांची सवय व्हावी, या उद्देशाने महापालिका दरवर्षी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. स्वच्छतेला अनुसरून सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, प्रभाग, हॉटेल आदी वर्गवारीत विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या उपक्रमांना नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभागी मिळत असून स्वच्छतेत नवी मुंबई शहराला देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनवण्याचा मानस आखला आहे.
स्वच्छ भारत अभियान 2023 ला सामोरे जात असताना शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी, यासाठी शहरातील भिंती रंगवण्याचे काम सुरू झाले आहे, तर लोकसहभाग वाढवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
संजय देसाई,
शहर अभियंता, नमुंमपा