| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील 1,362 लिपीक पदांच्या भरतीसाठी 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर झालेला तांत्रिक गोंधळ आणि उमेदवारांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मुंबई मुख्य पीठासाठी 830, नागपूर खंडपीठासाठी 166 आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी 366 पदे आहेत. सुमारे 13 हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मात्र, परीक्षा सुरू असताना सर्व्हर बंद पडणे, संगणकातील बिघाड, प्रणाली संथ होणे तसेच परीक्षा अचानक बंद होणे यांसारख्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आक्षेप घेत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करून नव्याने टायपिंग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.







