बळीराजा संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यात गुरे चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली असून ही गुरे चोरणारी टोळी पकडा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांतर्फे तळा पोलीस ठाणे व तहसिल कार्यालयाला देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात तळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जवळपास 100 ते 125 गुरे चोरीला गेली आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी तळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गुरे ही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची जोपासना शेतकरी आपल्या लहान मुलाप्रमाणे करतो. मात्र तालुक्यात गुरे मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असताना देखील पोलीस प्रशासन त्यावर काहीच उपाययोजना करीत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दहा दिवसात गुरे चोरणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष भास्कर गोळे, ज्ञानेश्वर भोईर यांसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version