श्रीवर्धन नगरपालिकेचा अजब प्रकार

खड्डे भरण्यासाठी वापरली खडी, भक्तांमध्ये नाराजीचा सूर


| श्रीवर्धन | वार्ताहर |

नगरपरिषदेने यावर्षी खड्डे भरण्यासाठी पावसाळी वापरण्यात येणाऱ्या केमिकल डांबराचा वापर न करता खड्ड्यांमध्ये फक्त खडी भरून त्यावरती रोलर फिरवला होता. परंतु पाच दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी सकाळी भरलेले खड्डे दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे उखडून गेले. त्यामुळे गणेश भक्तांना गणेश मिरवणुका खडबडीत रस्त्यावरूनच न्याव्या लागल्याने नाराजीचा सूर आहे.

नगरपरिषदेने खड्डे भरले नसते तरीही चालले असते. परंतु त्या खडीचा प्रचंड त्रास नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत होत होता. नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक समोर व उपजिल्हा रुग्णालयासमोर खड्डे भरण्यासाठी फक्त खडीचा वापर केल्याने संपूर्ण खडी रस्त्यावरती अस्ताव्यस्त पडली आहे. यावरून दुचाकी स्वार देखील घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्डे भरण्यासाठी खडीचा वापर करण्याची शक्कल कोणत्या अभियंत्यांनी वापरली त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता गणपती सणाच्या अगोदरच नगरपरिषदेने पावसाळ्यात वापरण्यात येणारी केमिकल डांबर वापरून खड्डे भरणे अपेक्षित होते. काही ठिकाणचे खड्डे नगरपरिषदेने समुद्रकिनाऱ्यावर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून भरून घेतल्याची चर्चा आहे. परंतु सदर कामगारांना खड्डे भरल्यानंतर त्यावरती पाणी ओतणे आवश्यक आहे. याबाबत कोणीही सूचना न दिल्याने भरलेले खड्डे पूर्णपणे पुन्हा उखडून गेले. तरी नगर परिषदेने रस्त्यावर पडलेली खडी तातडीने उचलने गरजेचे आहे. जेणेकरून अपघात होणे टाळले जाईल, तसेच दहा दिवसांच्या गणपती विसर्जना अगोदर केमिकल डांबराने खड्डे भरण्यात यावेत. अशी मागणी श्रीवर्धन मधील नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version