अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सार्वजनिक बांधकाम विभागाने बेलोशी-वावे रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही खडी तशीच पडून आहे. रस्त्यावरील खडी येणार्या जाणार्या दुचाकी वाहन चालकांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या खडीमुळे वाहन घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी ते वावे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम अर्थसंकल्पातून मंजूर केले. लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या बाजूला मोठी खडी टाकण्यात आली.परंतु ही खडी पडून राहिल्याने ती रस्त्यावर आली आहे. महाजने बेलोशी, वावे, गंगेचीवाडी, दिवीवाडी, व इतर गावांमधून येणार्या जाणार्या दुचाकी चालकांना या रस्त्यावरील खडीचा प्रचंड त्रास होत आहे. रस्त्यावर खडी आल्याने अपघात होण्याची भिती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना चालकांना कसरत करावी लागत असताना रस्त्याच्या कामासाठी टाकलेली खडीचा वापर न झाल्याने ती खडी अपघाताला कारणीभूत ठरण्याची चिंता प्रवाशांनी व्यक्त केली आहे.