उन्हाळी सुट्टीत जलतरणाची पर्वणी

नागावच्या समर स्विमिंग कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्साह

| चौल | प्रतिनिधी |

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना काहीतरी वेगळे आणि आरोग्यदायी शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने पीएनपी सायरस पूनावाला स्कूल, नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समर स्विमिंग कॅम्पला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्व वयोगटातील सहभागींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कॅम्प परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

2 मे ते 1 जून 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या कॅम्पमध्ये विशेषतः 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. दररोज सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये अनुभवी प्रशिक्षक स्विमिंगचे मुख्य प्रशिक्षक अमर पाटील, दिनेश मानकर यांच्याकडून पोहण्याचे तंत्र, पाण्यातील सुरक्षितता, शारीरिक संतुलन आणि फिटनेस यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.


आजच्या मोबाईल आणि स्क्रीनच्या युगात मुलांनी मैदानी व आरोग्यदायी उपक्रमांकडे वळावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच स्विमिंग शिकण्यास सुरुवात केली असून, काही दिवसांतच त्यांच्या आत्मविश्वासात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे प्रशिक्षक अमर पाटील यांनी सांगितले.

अत्याधुनिक स्विमिंग पूल, सुरक्षित वातावरण आणि माफक शुल्क यामुळे नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढविणारा हा स्विमिंग कॅम्प विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, आगामी काळातही अशा उपक्रमांना अधिक प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आजच्या मोबाईलच्या युगात मुलं घरातच जास्त वेळ घालवतात. अशावेळी अशा स्विमिंग कॅम्पमुळे मुलांना शारीरिक व्यायाम, आत्मविश्वास आणि शिस्त शिकायला मिळत आहे. माझ्या मुलामध्ये काही दिवसांतच सकारात्मक बदल दिसून आला. प्रशिक्षकांकडून सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात असल्याने पालक म्हणून आम्हालाही समाधान वाटत आहे.

पालक

या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच पाण्यात उतरले, मात्र आता त्यांच्यातील भीती कमी होत असून, आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. पोहणे हा केवळ खेळ नसून, जीवनरक्षक कौशल्य आहे. त्यामुळे मुलांनी लहान वयातच जलतरण शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अमर पाटील,
स्विमिंग प्रशिक्षक
Exit mobile version