कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार

एक गंभीर जखमी

| म्हसळा । वार्ताहर ।

गोरेगाव-श्रीवर्धन राज्य मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश असून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

गोरेगाव-श्रीवर्धन राज्य मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत हमरस्त्यावर रविवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोरेगावकडून म्हसळाकडे जाणाऱ्या स्विप्ट चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात गाडीचालक मोहम्मद रफीक शेख (34), कृष्णा हरिशचंद्र कांबळे (45), तर मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख (5) हे जागीच ठार झाले असून मोहमद याचा 6 वर्षाचा मोठा मुलगा ईसा महमद शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्वयंसेवी नागरीक आणि पोलीसांनी गाडीत अडकलेल्याना बाहेर काढून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात प्रकरणी म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून पंचनामा व तपास सुरु आहे.

Exit mobile version