आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण
| पनवेल । वार्ताहर ।
खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याने येथील आदिवासी वाड्यांवरील लोकवस्ती धास्तावली आहे. गेल्या महिन्याभरात वाघाचा तीन वेळा वावर दिसला आहे. पहिल्या दोन घटनांमध्ये टाटा पावर कंपनीचे काम करणार्या कर्मचार्यांना या परिसरात वाघ दिसला. तसेच दोन आठवड्यापूर्वी बेलापूरकडून खारघर हिलवरील चाफेवाडी आदिवासी वाडीकडे जाण्याच्या रस्त्यावर बोगद्याजवळ पारधी कुटूंबीयांनी हाकेच्या अंतरावरुन वाघाला पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका रिक्षातून किरण पारधी यांचे कुटूंब चाफेवाडीकडे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळेस वाघ एका बैलाच्या मागे गेल्याचे पारधी कुटूंबीयांनी पाहीले. रिक्षाच्या मागून त्यावेळेस दुचाकीवर किरण हे येत होते. वाघाला पाहील्यानंतर रिक्षातील सर्वेच घाबरले. किरण यांच्या रिक्षाचालक मुलाने पहिली बातमी वडिलांना सांगून त्यांना खबरदार केले. मात्र किरण यांनी रिक्षातील सर्वांना धीर दिला. वाघ बैलाच्या मागावर असल्याने चिंता न करता रिक्षा व्यवस्थित घरच्यादिशेने घेऊन जाण्याचा सल्ला वडील किरण यांनी मुलगा, पत्नी व मेव्हणीला दिला. अखेर कसे बसे पारधी कुटूंबीय वाघाच्या भीतीने घरी चाफेवाडीकडे परतले.
या घटनेबाबत वाडीतील एका जागरुक व्यक्तीने खारघर हिलवर वाघ असल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आणि वनविभाग तसेच सिडकोच्या सूरक्षा विभागाला दिली. खारघर हिलवर नेहमी सायंकाळी व पहाटे वॉकींगसाठी शेकडो खारघरवासियांची ये-जा सूरु असते. या तीनही घटनांमध्ये वाघाची माहिती सिडको सूरक्षा विभागाने वन विभागाला दिल्याचे सूरक्षा विभागाचे बाळू पाटील यांनी सांगीतले.