बच्चू कडूंचा कृषीमंत्र्यांवर प्रहार
। नाशिक । वृत्तसंस्था ।
शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. महायुतीत ते गेल्यावेळी मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा घरोबा केला. विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेताना दिसतात. सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.
शुक्रवारी (दि.11) रात्री 11 वाजता बच्चू कडू, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. सरकारने निवडणुकीमध्ये शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकर्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकर्यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, असे कडू म्हणाले. शेतकर्यांच्या पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही. अपंगांना द्यायला पैसे नाही असे सरकार म्हणते. सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यांचं नुकसान होत आहे. भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं होत. रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच पण जनतेसोबत देखील बेमान झाले. प्रभू रामचंद्राची शपथ ही बेइमानी आम्ही उखडून काढू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
कोकाटे यांच्यावर टीका
माणिकराव कोकाटे ही शेतीतून आलेले आहेत. परंतु पद आल्यानंतर त्यांनी शेतकर्यांविषयी असे वक्तव्य करणे योग्य नाही. ते बदलतील असं वाटत नव्हतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे कडू म्हणाले. माणिकराव कोकाटे तुम्ही कृषिमंत्री आहात, तुम्ही शेतकर्यांचे पालक आहात. मी त्यातला नाही असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे, असा सज्जड दम त्यांनी दिला.