| माणगाव | वार्ताहर |
माणगावात जैन संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान महावीर जयंती गुरवार, दि. 10 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात माणगाव शहरातील जैन बांधव-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त माणगाव शहरातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. कचेरी रोड माणगाव येथील जैन मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात होऊन मुंबई-गोवा महामार्गावरून बालाजी कॉम्पलेक्स येथून वळसा घेऊन पुन्हा जैन मंदिर ठिकाणी मिरवणुकीची उत्साहात सांगता करण्यात आली. यानंतर जैन बांधवांनी माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम केंद्र उतेखोल येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. त्यानंतर माणगाव येथील राजस्थान कॉलनीत सायंकाळी भक्ती संध्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमात माणगाव जैन संघटनेचे बांधव-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी केली.