आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा 30 जुलै हा पहिला स्मृतिदिन… डॉ.किसन माने यांनी त्यांच्यावर लिहिला चरित्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्या चरित्रग्रंथाला आमदार जयंत पाटील यांनी लिहिलेली ही प्रस्तावना.
962 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून सर्व जागा जिंकण्याचं काँग्रेसचं उद्दिष्ट होतं. इतर तालुक्यात ते ठीक होतं. पण सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे तेव्हाचे तरुण उमेदवार गणपतराव देशमुख यांच्यापुढे आपली डाळ शिजणार नाही हे काँग्रेसी नेत्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी खुद्द यशवंतराव चव्हाण यांना शब्द खर्चायला लावला. चव्हाण यांनी त्यांच्या मानाने अगदीच नवीन असलेल्या गणपतरावांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. त्यापूर्वी यशवंतरावांनी याच रीतीने शंकरराव मोरे, जेधे यांच्यापासून ते रिपब्लिकनांमधील दादासाहेब गायकवाडांना आपल्याकडे वळवले होते.
पण यशवंतरावांची मोहिनी गणपतरावांच्या बाबतीत निष्प्रभ ठरली. त्यांनी शेकापतर्फेच त्यांची ती पहिली निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकले. तेव्हाच नव्हे तर पुढे आयुष्यभर गणपतरावांनी शेकापशी असलेली ही बांधिलकी घट्टपणे कायम ठेवली. पुढे तर एकदा त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आली होती. पण पक्षाच्या निष्ठेपुढे त्यांनी तीदेखील कःपदार्थ मानली.
आज देशभर सांगोल्याचं नाव भलत्याच माणसाच्या ‘पराक्रमा’ने गाजत असताना निष्ठा, सचोटी, लोकांसाठीची तळमळ यांचा उत्तुंग आदर्श असलेला नेता याच सांगोल्याच्या मातीतून निर्माण झाला आणि त्याने आभाळाएवढे कर्तृत्व गाजवले हे पुन्हापुन्हा सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. किसन माने यांनी या पुस्तकाद्वारे भावी पिढ्यांसाठी ही अत्यंत मोलाची कामगिरी करून ठेवली आहे.
गणपतराव देशमुख, ज्यांना प्रेमाने सर्वच लोक आबासाहेब म्हणत, हा माणदेशी मातीतला सच्चा लोकसेवक होता. 1960 पासून दोन वेळांचा अपवाद वगळता शेतकरी कामगार पक्ष हा सदैव विरोधी पक्ष म्हणूनच वावरला. कष्टकरी, वंचितांचा पक्ष असल्याने आमच्याकडची साधनेही बहुतेकदा मर्यादित राहिली. पण तरीही आबासाहेब तब्बल अकरा वेळा सांगोल्यातून विधानसभेवर निवडून गेले. हा एक जागतिक विक्रमच म्हणायला हवा.(2019 ला तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी माघार घेतली नसती तर तेच पुन्हा निवडून आले असते.) शरद पवारांसारखे अनेक नेते कित्येक दशके अशाच रीतीने निवडून गेले आहेत. पण त्यांच्यामागे सत्तारुढ असलेल्या बलिष्ठ काँग्रेसचं वलय होतं.
आबासाहेबांचे विजय हे त्यांनी मतदारांशी जोडलेल्या नात्यांची पावती होती. आणि एखाद्या उदार वतनदाराला प्रजेने निष्ठा वाहावी असा हा प्रकार नव्हता. आबासाहेब आणि सामान्य जनता यांच्यातलं नातं हे समानतेवर आधारलेलं होतं. ते कितीही उंचीवर गेले तरी आपल्याला लोकांपैकीच एक मानत होते. सत्ता, संपत्ती, अधिकार ही सर्व परिवर्तनाच्या लढ्यातील साधने आहेत हे त्यांनी कधीही दृष्टिआड होऊ दिले नाही. त्यांचे कार्यकर्ते, आप्तस्वकीय, सहकारी इत्यादींनी या पुस्तकाच्या अखेरीस जी मनोगते व्यक्त केली आहेत त्यातून या समानतेवर आधारलेल्या नात्याचा उत्तम प्रत्यय येतो. डॉ. माने यांनी याबाबत स्वतःचा जो अनुभव दिला आहे तोही याचाच नमुना आहे. माने हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत होते. त्यावेळी आबासाहेबांनी प्रचारासाठी पाच दिवस दिले तर मी त्यांच्यासाठी आयुष्याची पाच वर्षे देईन असे ते माने एका प्रचारसभेत बोलून गेले. त्यावर आबासाहेबांनी तात्काळ पाच वर्ष माझ्यासाठी नकोत, पक्षासाठी द्या अशी दुरुस्ती केली. इतकी सजगता आणि विचारांमध्ये स्पष्टता असलेला कोणाही नेत्याबद्दल अनुयायांना आत्मीयता वाटेल यात नवल ते काय. आबासाहेबांनी ही आत्मीयता उदंड कमावली.
देशभरात आणि महाराष्ट्रात डाव्या चळवळीमध्ये अनेक लोकोत्तर नेते होऊन गेले. अनेकांनी संघटना बांधल्या. मैदाने गाजवली. मोठमोठी आंदोलने करून सरकारला जेरीला आणले. पण एकीकडे लोकचळवळी उभारून दुसरीकडे संसदीय आणि संस्थात्मक राजकारणात प्रदीर्घ काळ आपला ठसा उमटवणारे फार थोडे नेते होऊन गेले. त्या थोड्यांमध्ये आबासाहेबांचा क्रमांक अव्वल असेल यात शंका नाही. सांगोला परिसरात आबासाहेबांनी किती विविध प्रकारच्या संस्थांची उभारणी केली आहे याचा या पुस्तकातील तपशील वाचताना आपल्याला थक्क व्हायला होते.
सांगोला सहकारी सूत गिरणी, महिलांची स्वतंत्र सूत गिरणी, खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी संस्था, शिक्षणसंस्था.. हा सर्व पसारा मोठा आहे. या संस्था उभ्या करताना आबासाहेबांनी किती बारीकसारीक गोष्टींचे अवधान ठेवले होते याचे चांगले वर्णन माने यांनी केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संस्थेचे आर्थिक व्यवहार अत्यंत पारदर्शक राहतील याची खबरदारी घेतली. त्यासाठी वेळोवेळी स्वतः उदाहरण घालून दिले. मुलगा प्रफुल्ल हा प्राणिशास्त्रात डॉक्टरेट मिळालेला असूनही स्वतःच्या संस्थेच्या महाविद्यालयात त्याची नेमणूक करायला त्यांचा विरोध होता. आणखी एका प्रसंगी बहुदा आबासाहेबांच्या घरचा पाण्याचा पंप बिघडल्याने सूत गिरणीतील कामगार तिथला पंप घेऊन आले. हे कळताच आबासाहेबांनी त्यांची खरडपट्टी काढली व तो परत नेऊन ठेवण्यास सांगितले. माने यांनी अशी कितीतरी उदाहरणे दिली आहेत. खुद्द आबासाहेबांनीच निस्पृहतेचा असा आदर्श घालून दिल्यामुळे त्यांच्या संस्था आजही चांगले काम करीत आहेत. सांगोला सूत गिरणीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात होते. महिला सूत गिरणीमुळे तेथील महिलांना स्वावलंबी रोजगाराचे साधन मिळाले आहे.
लोकसहभागातून ज्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या त्यातून निर्माण झालेला पैसा लोकांच्याच गरजांसाठी खर्च करण्याचे एक वळण आबासाहेबांनी घालून दिले. सांगोला हा मुळातच दुष्काळी माणदेशातील एक तालुका. त्यामुळे अवर्षणाचे संकट वारंवार झेलावे लागते. त्यातही मोठा दुष्काळ पडतो तेव्हा लोकांचे अपरिमित हाल होतात. अशा वेळा जेव्हा आल्या तेव्हा सांगोल्यातील संस्थांनी जनावरांसाठी उभारलेल्या चारा छावण्या किंवा लोकांना केलेली अन्नधान्याची मदत ही पूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरते. कोरोनाच्या काळातही खरेदी-विक्री संघ, बाजार समिती इत्यादींनी हजारो कुटुंबियांना गावोगाव फिरून केलेला अन्नधान्याचा पुरवठा हा याच बांधिलकीचे उदाहरण होता.
यातील काही संस्थांशी माझाही काही कारणाने संपर्क आला आहे. उदाहरणार्थ माणगंगा सहकारी साखर कारखाना हा काही त्यांनी थेट प्रवर्तित केलेला नव्हे. उलट अन्य पक्षीय नेत्यांचा तो उपक्रम. पण आपल्या प्रदेशातील लोकांचे हित लक्षात घेऊन आबासाहेबांनी त्यांना मदत केली. त्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे आम्ही काही कर्जसाह्य केले. लोकांच्या कामासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला सहकार्याचा हात पुढे उभे करण्याची अशी असंख्य उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात. सांगोल्यातील ग्रामीण मुलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात या हेतून त्यांनी 1991 मध्ये विज्ञान महाविद्यालय सुरू केले. नेमके त्याच वर्षी शहरातील दुसर्या संस्थेनेही असेच कॉलेज काढण्यासाठी मग उचल खाल्ली. एक आमदार म्हणून केवळ आपल्याच संस्थेच्या कॉलेजचे काम पुढे रेटायचे व दुसर्या संस्थेच्या प्रकल्पात आडकाठी आणायची हे आबासाहेब करू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट त्यांनी तिला सहकार्य करून दोन्ही संस्थांना पुरेसे विद्यार्थी मिळतील अशी व्यवस्था आबासाहेबांनी केली. आज ती दोन्ही कॉलेजेस चांगल्या रीतीने चालू आहेत त्याचे श्रेयही त्यांनाच द्यायला हवे. नगरपालिका, जिल्हा परिषदा, सूत गिरणी या सर्वच ठिकाणी इतर पक्षांशी वा गटांशी सहयोग करून जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी सदैव घेतली.
सांगोल्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी टेंभू योजनेचे पाणी आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे तर आजच्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी कार्यपुस्तिका ठरतील असे आहेत. या प्रयत्नांची सुरुवात झाली तेव्हा भाजप-सेना युतीचे सरकार होते. पण केवळ आबासाहेबांच्या प्रतिष्ठेमुळेच ते पुढे जाऊ शकले. पुढची जवळपास पंधरा-वीस वर्षे अत्यंत चिकाटीने त्यांनी हे काम तडीला नेले. शिवाय याच्या जोडीने जलसंधारणाबाबत जागृतीसाठीही त्यांनी खूप मेहनत घेतली.
आबासाहेब प्रदीर्घ काळ आमदार म्हणून निवडून येत राहिले. म्हणजे त्यांचा राजकीय प्रवास सोपा होता असे कोणाला वाटेल. प्रत्यक्षात सोलापूर हा पूर्वापार काँग्रेसच्या अनेक मातबर नेत्यांचा जिल्हा राहिला आहे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व मार्गांचा उपयोग करण्याबाबत हे नेते प्रसिध्द होते. लक्षभोजनामुळे महाराष्ट्रात गाजलेले शंकरराव मोहिते-पाटील, त्यांचे त्यांच्याच पक्षातले स्पर्धक असलेले नामदेव जगताप, पंढरपूरचे परिचारक इत्यादी लोक बलिष्ठ होते. जगतापांचे जिल्हा परिषदेवरचे वर्चस्व मोडण्यासाठी आबासाहेबांनी मोहिते-पाटलांना मदत केली. त्याचा लाभ असा झाला की, त्यांना सांगोला पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करता आले. अगदी अलिकडे माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लोकसभा लढवली तेव्हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आबासाहेबांच्या हस्ते झाला. किंबहुना, या पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे त्यांच्याकडून पाठिंब्याचा शब्द घेतल्यानंतरच पवारांनी रिंगणात उतरण्याचे ठरवले. संसदीय राजकारणात स्थानिक राजकारणात अशा तडजोडी अपरिहार्य असतात. तिथे निव्वळ शुद्धतावादी भूमिका घेतली तर पक्षाचा प्रभाव टिकत नाही. विस्तार होण्याच्या शक्यता संपत जातात. आबासाहेबांना हे भान अचूक होते. पण यात नेता म्हणून आपले स्वतःचे तसेच पक्षाचे आणि विचारसरणीचे स्वत्व टिकवून ठेवणे हे सोपे नसते. आबासाहेबांचे मोठेपण असे की, अशा प्रासंगिक तडजोडी करूनही त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर वा त्यांच्या शेकापशी असलेल्या निष्ठेबाबत शंका घेण्याची एकाचीही हिंमत झाली नाही. हे बावनकशी चारित्र्य हीच आबासाहेबांची सर्वात मोठी कमाई होती. आणि ते तुमच्यापाशी असेल तर तात्कालिक राजकीय तडजोडींमुळे तुमच्या सदर्याला बदनामीचा चिखल लागू शकत नाही.
भांडवलशाही व जमातवाद यांच्या अत्यंत विषारी युतीचा असा हा सध्याचा काळ आहे. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसाठी अनेक दिशांनी अनेक शत्रू अंगावर येण्याचा अनुभव रोजचा झालेला आहे. अशा स्थितीत मुख्य शत्रू कोण, लढाईची प्राथमिकता कोणती हे ठरवणे किचकट ठरते. त्यावेळी आबासाहेबांसारख्यांनी घालून दिलेले धडे राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरू शकतात. माने यांनी या पुस्तकात आबासाहेबांच्या राजकीय प्रवासाचे विस्ताराने दिलेले तपशील त्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा तसेच डाव्या चळवळीचा अभ्यास करणार्या अकादमिक अभ्यासकांनाही हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे.
पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, आबासाहेबांच्या राजकारणाच्या काही मर्यादाही मान्य केल्या आहेत. जसे की, सांगोल्यात इतके हुकुमी यश मिळूनही बाहेर सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात शेकापचा विस्तार होऊ शकला नाही. सांगोल्यातील विविध व्यापांमध्ये अडकून पडल्यामुळे आबासाहेबांना बाहेर जाण्यासाठी पुरेसा वेळ देता आला नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला असता तर सांगोल्यातील यश टिकवता आले नसते असे लेखक स्पष्टपणे नोंदवतात.
मुंबईतील मंत्रालय आणि विधिमंडळात असलेला आबासाहेबांचा दबदबा हा खरं तर स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे. एरवी कितीही गदारोळ चालू असला तरी विधिमंडळात ते उभे राहिल्यानंतर सभागृह कसे शांत होत असे याचा अनुभव मीदेखील अनेकदा घेतला आहे. आबासाहेबांचे पूर्ण लांबीचे भाषण असो वा एखादाच हरकतीचा मुद्दा तो तितकाच प्रभावी असे आणि सत्ताधारी कोणीही असले तरी त्यांना त्याची दखल घ्यावीच लागे. मंत्रालयातही ते गेल्यानंतर मंत्री व अधिकारी आदराने उठून उभे राहत असत. सर्व महाराष्ट्राला आबासाहेबांचे हे रुप परिचित आहे. मात्र यामुळे सांगोला तालुक्यात गणतपतराव देशमुख यांची एकहाती सत्ता असावी असा अनेकांचा समज होतो. प्रत्यक्षात आबासाहेबांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना विविध स्तरांवर शक्य तितकी अधिकारपदे देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणात कमी असले तरी व्यवहाराला पक्के असलेले अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले.
माने यांच्या या पुस्तकाचे मोठे योगदान हे आहे की आबासाहेबांच्या त्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यासकट या पुस्तकात स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळातील सवंगड्यांच्या मदतीने श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलून धरला तसा आबासाहेब व त्यांच्या सवंगड्यांनी कार्याचा गोवर्धन वर उचलला. या सवंगड्यांचा यथोचित गौरव आबासाहेबांच्या बरोबरीने या पुस्तकात करण्यात आला आहे.
जगन्नाथराव लिगाडे यांचे एकच उदाहरण इथे देतो. सहावी शिकलेले 1979 मध्ये लिगाडे यांना आबासाहेबांनी पंचायत समितीचे सभापती केले तेव्हा अनेकांनी ते कसे काम करणार म्हणून शंका व्यक्त केली. पण आबासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या लिगाडे यांनी घरच्या भाकरी खाऊन तब्बल 17 वर्षे चोख कारभार केला. नंतर सूतगिरणीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. मागास वा अल्पसंख्य समाजातील कार्यकर्ते, अशिक्षित, महिला यांना आबासाहेबांनी अशाच रीतीने पुढे येण्यास सतत प्रोत्साहन दिले. आबासाहेबांचा साधेपणा, सार्वजनिक पैशांच्या विनियोगाबाबत काटेकोरपणा, एसटी वा टॅक्सीने प्रवास करणे, स्वतःच्या कुटुंबियांना राजकीय पदे घेण्यापासून परावृत्त करणे याबाबतच्या असंख्य आठवणी या पुस्तकात विखुरल्या आहेत. काही प्रमाणात महाराष्ट्राला आबासाहेबांच्या या पैलूंची ओळख आहे. पण तरीही येथे दिलेल्या तपशीलांमुळे एका साध्या पण तत्वांच्या बाबतीत करारी असलेल्या व्यक्तिमत्वाचे उत्तम चित्रण घडून आले आहे. सध्या महाराष्ट्रात इतिहासकालीन थोर पुरुषांवरच्या चित्रपटांची लाट आली आहे. पण आबासाहेब नावाचा असाच एक थोर पुरुष या महाराष्ट्राच्या भूमीत आता आतापर्यंत कार्यरत होता. कोणीतरी त्यांच्या व्यक्तिमत्वावरच एखादा चित्रपट निर्माण करायला हवा. हे पुस्तक हे त्या चित्रपटासाठी चांगला आधार ठरू शकेल. डॉ. किसन माने यांनी आबासाहेब आणि त्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास पुढील पिढ्यांकडे नेण्यासाठी हे एक उत्तम काम केले आहे.