| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणार्या जुन्या मंडळांमध्ये तुर्भे स्टोअरमधील नवयुवक मित्र मंडळाचाही समावेश आहे. 53 वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील सर्व नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्याची भावना निर्माण केली जात आहे. आरोग्याविषयी जनजागृती व देखाव्यांमधूनही समाज प्रबोधनाचा वारसा जपण्यात आला आहे.
तुर्भे स्टोअर परिसरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवयुवक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. 1972 मध्ये या उत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून समाजप्रबोधनाचा हा वारसा अखंडपणे 53 वर्षे सुरू आहे. पाच दशकाच्या वाटचालीमध्ये उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य वाढविण्यात यश आले आहे.
कष्टकरी नागरिकांची वसाहत असलेल्या तुर्भे स्टोअर्स परिसरातील नागरिकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यात व समाज प्रबोधन व आरोग्य जागृती करण्यावर भर दिला जात आहे. मंडळाची सर्व कार्यकारिणी व सदस्य उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यामध्ये मंडळाचे आधारस्तंभ सुरेश कुलकर्णी, सल्लागार महेश कुलकर्णी, ज्ञानदेव सुळसकर, अध्यक्ष अभिमान मंजुळकर, सचिव वसंत वास्के, खजिनदार केशवलाल मौर्य यांचा मोलाचा वाटा आहे.
प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.या वर्षी शंकरा आय हॉस्पिटल च्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी फक्त उत्सवापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून यंत्रणा उभी केली आहे.