| पनवेल | वार्ताहर |
जेएनपीटी ते पळस्पेकडे जाणार्या रस्त्यावर निसर्ग ढाब्याजवळ 26 डिसेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोळसा भरलेल्या ट्रकला (क्र. एमएच 42 बीएफ 3131) आग लागली होती. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे फायर ब्रिगेडच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
रात्रगस्तीदरम्यान उरणवरून पनवेलकडे येत असताना वाहतूक शाखेचे पीएसआय मनोज महाडिक व चालक निकम, पोलीस शिपाई चव्हाण यांनी एका कोळसा घेऊन जाणार्या ट्रकला आग लागली असल्याचे पाहिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ पनवेल महानगरपालिका फायर ब्रिगेडला बोलावले. फायर ब्रिगेडची गाडी येऊन त्यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.