डॉ. श्याम ढवण यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
| अलिबाग | प्रतिनिधी |
सामाजिक आणि औद्योगिक योगदानाबद्दल डॉ. श्याम ढवण यांना राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील मूळ रहिवासी असणारे ढवण यांच्यामुळे अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुका आणि सासवणे गावाचे नावलौकिक झाले आहे. पशुवैद्यकीय पदवीधर असलेल्या डॉ. ढवण यांनी शासकीय नोकरी सोडून ग्रामीण भागातील रोजगाराला चालना दिली. त्यांनी प्रीमियर फीड चिक्स या नावाने कुक्कुट खाद्यनिर्मितीचा उद्योग सुरू करून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी अँटी स्नेक वेनम या औषधाची निर्मिती केली. ज्यामुळे विषारी सापांच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवता आले. त्यांचे हे कार्य केवळ व्यावसायिक यश नसून, ग्रामस्वराज्याचा एक आदर्श म्हणून पाहिले जाते. डॉ. ढवण यांचा हा सन्मान ग्रामीण भारताच्या उद्योजकतेचा आणि समाजसेवेचा गौरव मानला जातो.







