तळ्यातील 26 बौद्ध लेण्यांकडे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष; पायाभूत सुविधांचा दुष्काळ, स्थानिक रोजगाराची संधी वाया
| तळा | श्रीकांत नांदगावकर |
रायगड म्हटले की अलिबागचे समुद्रकिनारे आणि मुरुडचा जंजिरा डोळ्यासमोर येतो. मात्र, याच रायगडच्या तळा तालुक्यात मुंबईपासून अवघ्या 130 किमी अंतरावर 26 बौद्ध लेण्यांचा तब्बल 2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित अवस्थेत आहे. तळा शहरापासून अवघ्या 7 किमी अंतरावर राजपुरी खाडीच्या काठावर असलेल्या कुडा लेण्यांकडे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ऐतिहासिक वारशासोबतच स्थानिक रोजगाराची मोठी संधीही वाया जात आहे.
200 फूट उंच डोंगरात असलेल्या या लेण्या इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंत सातवाहन काळात खोदल्या गेल्या. दोन स्तरांवर असलेल्या 26 लेण्यांमध्ये 4 चैत्यगृहे आणि 22 विहार आहेत. प्रवेशद्वारावरील हत्तींची भव्य शिल्पे, स्तूप, ब्राह्मी लिपीतील 32 शिलालेख आणि 11व्या लेणीतील दुर्मिळ जलघोड्याचे (हिप्पोकॅम्पस) शिल्प ही येथील वैशिष्ट्ये आहेत. हीनयान पंथापासून महायानकडे झालेला प्रवासही येथे पाहायला मिळतो. एएसआय संरक्षित असूनही येथे मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे.
इंदापूर-तळा रस्ता काँक्रिटचा असला तरी लेण्यांपर्यंतचा शेवटचा 1.5 किमीचा चढाव कच्चा आणि घसरडा आहे. सार्वजनिक वाहतूक नसल्याने रिक्षासाठी 400 रुपये मोजावे लागतात. परिसरात पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह नाही. राहण्यासाठी एमटीडीसी रिसॉर्टही नाही. लेण्यांमध्ये वटवाघळांचा वावर असून पाणी गळतीमुळे शिल्पांची झीज होत आहे. गुगल मॅपवर चुकीचे लोकेशन आणि सोशल मीडियावर माहितीचा अभाव असल्याने पर्यटक येथे पोहोचत नाहीत. जिल्हा पर्यटन आराखड्यात कुडा लेण्यांचा उल्लेखही नाही. पर्यटनाचा सर्व निधी अलिबाग-काशिद-मुरुडपुरताच मर्यादित असल्याने तळा तालुक्यातील या ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष होत आहे. लेण्यांपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, पायऱ्या व रेलिंग, स्वच्छतागृहांची सुविधा आणि तळागड-कुडा लेणी असे एकत्रित पर्यटन सर्किट विकसित केल्यास तळा तालुका रायगडच्या पर्यटन नकाशावर येऊ शकतो.
स्थानिक अर्थकारणाला फटका
मुरुडला येणाऱ्या 10 लाख पर्यटकांपैकी केवळ 5 टक्के पर्यटक कुडा लेण्यांकडे वळले, तरी वर्षाला 50 हजार पर्यटक आणि अडीच कोटींची उलाढाल गावात होऊ शकते. यातून 20-25 तरुणांना स्थानिक गाईड, होमस्टे आणि गावरान जेवणाच्या व्यवसायातून रोजगार मिळू शकतो. त्यामुळे गणपतीनंतर मुंबईकडे होणारे स्थलांतरही थांबण्यास मदत होईल.
