नदीपात्रात भिंत उभारून पुराला निमंत्रण

मॅरेथॉन, साईवर्ल्ड सिटीचे सीआरझेड नियम धाब्यावर
शेकापचे अनिल ढवळे आक्रमक, कारवाई न झाल्यास मोर्चाचा इशारा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

टोलेजंग टॉवर उभारण्याच्या नादात पनवेलमध्ये नद्या-नाले बुजविण्याचा सपाटा सुरू असून, आता थेट नदीपात्रातच भिंत उभारून नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याचा प्रकार पळस्पे फाटा येथे समोर आला आहे. मॅरेथॉन आणि साईवर्ल्ड सिटी पॅराडाईज ग्रुपकडून सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रात बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या बांधकामामुळे पळस्पे गावावर पुराचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करत नदीपात्रातील भिंत तातडीने तोडण्याची मागणी शेकाप शेतकरी सभा रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पनवेलच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून, कारवाई न झाल्यास माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

पनवेलचा विस्तार झपाट्याने होत असताना उंच इमारतींच्या बांधकामासाठी नैसर्गिक नाले आणि नदीपात्रांमध्ये भराव टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी, पावसाळ्यात नदीपात्र अरुंद होऊन परिसरातील गावांना पुराचा फटका बसत आहे. दरवर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पंचनामे केले जातात; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत महसूल विभाग उदासीन असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.

प्रबळगडातून उगम पावणारी तसेच इरसाळगड, भाताण आणि वांगण्ोश्वरच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांचा संगम होऊन धाकली नदी तयार होते. याच नदीकिनारी मॅरेथॉन आणि साईवर्ल्ड सिटी हे विकासक 30 ते 32 मजली इमारती उभारत आहेत. या बांधकामासाठी नदीपात्र अडवून भराव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडून नदी प्रदूषित केल्याचेही ढवळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या बांधकामामुळे पावसाळ्यात पळस्पे गावात पाणी शिरते, तर शिवकर परिसराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली जात असल्याने गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील भिंत आणि बेकायदेशीर बांधकामे तातडीने निष्कासित करावीत, अशी मागणी अनिल ढवळे यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Exit mobile version