प्रीतम म्हात्रे यांना मित्रांची अनोखी भेट

20 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उचलला भार


| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाला त्यांचे सहकारी मंगेश अपराज आणि भारत भोपी यांनी 20 विद्यार्थी शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यामुळे मंगेश अपराज आणि भारत भोपी यांनी प्रितम म्हात्रे यांना दिलेल्या अनोख्या गिफ्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मंगेश अपराज यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली तेवीस वर्षे काम करीत आहे. माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या शिकवणीनुसार आम्ही प्रीतम म्हात्रे यांच्या सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यात एक खारीचा वाटा उचलत आहोत. वाढदिवसाच्याआठ दिवस आधीच पनवेल तालुक्यातील रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी 20 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची समस्या सांगितली. या समस्येवर प्रितम म्हात्रे तोडगा काढतील असा मी मुख्याध्यापकांना शब्द दिला. मात्र, मी आणि भारत भोपी यांनी परस्पर 20 विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन प्रितमदादांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला व अंमलातदेखील आणला, याचा मनस्वी आनंद होत आहे, असे ते म्हणाले.

माझ्या वाढदिवसाला माझ्या सहकाऱ्यांनी 20 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भार उचलला आहे, याचा मला खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने मला वाढदिवसाला मिळालेले हे एक उत्तम गिफ्ट म्हणावे लागेल. माझे वडील जे.एम. म्हात्रे यांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीनुसार मी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना माझ्यासोबतचे सहकारीदेखील त्याच शिकवणीनुसार कार्य करीत आहेत, याचा मला अभिमान आहे.

Exit mobile version