क्रांतीज्योत फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

राखी बांधत वाहतूकीचे धडे

। पनवेल । वार्ताहर ।

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि.19) अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला. तसेच, यानिमित्त पनवेलमधील विजय सेल्स जवळील सिग्नल चौकात वाहतूक नियम मोडणार्‍यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी घ्या, वाहतूक नियम पाळा, असा संदेशही देण्यात आला.

रक्षाबंधनापासून वंचित राहणारे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनाही क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्यावतीने रक्षाबंधन शुभेच्छा देत राखी बांधण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा रूपाली शिंदे यांनी विचार मांडताना क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थांनी विविध सामाजिक कार्यातून जनतेचे प्रबोधन करत वेगवेगळे उपक्रम राबवावेत. तसेच, पुढेही आमचे जनप्रबोधन व सामाजिक कार्य चालूच राहील, असे मत व्यक्त केले. तसेच, वाहनचालक हेल्मेटचा वापर टाळतात, सीट बेल्ट लावत नाहीत, सिग्नल तोडणे असे विविध वाहतुकीचे नियम तोडतात. दरवर्षी वाहतूक विभागामार्फत देखील सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्याच धर्तीवर क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन वाहतुकीचे नियम मोडू नका, मृत्यूला सामोरे जाऊ नका हा संदेश देत घरी आपले परिवारातील सदस्य वाट पाहत असतात. यापुढे वाहतुकीचे नियम पाळा, असे मार्गदर्शन करत वाहतूक नियम मोडणार्‍यांना राखी बांधत स्वतःची व परिवाराची काळजी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी रक्षाबंधन उपक्रमाचा आनंद व्यक्त करत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जनतेला वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले. यावेळी, क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष रूपाली शिंदे, उपाध्यक्ष साधना गंगावणे, खजिनदार स्नेहा धुमाळ, हिंदू बगाटे आदी उपस्थित होते.

Exit mobile version