| पनवेल । प्रतिनिधी ।
बदलापूरसह राज्यात होणार्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पनवेलमध्ये जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणाबाजीने परिसर हादरवून सोडला.
पनवेल उरण महाविकास आघाडीचे कार्याध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शेकापचे माजी आदर्श नगराध्यक्ष तथा उद्योजक जे.एम.म्हात्रे, शिरीष घरत, सुदाम पाटील, श्रुती म्हात्रे, सतीश पाटील, भावना घाणेकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले की, जी घटना घडली आहे ती फार दुर्दैवी आहे. शाळा कोणत्याही राजकीय पक्षाची असो, प्रश्न एवढाच आहे तो म्हणजे शाळा व्यवस्थापन असे कसे कोणालाही रुजू करून घेते. विद्यार्थिनींना लघुशंकेला नेण्यासाठी शाळा प्रशासन कोणत्या निकषांवर तरुणाला नियुक्ती देताय. खरं तर शाळा प्रशासन यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दोषी आहे. आणि विकृतीचे दर्शन घडविणार्या आरोपीला आम्ही फाशी देण्याचीच मागणी करीत आहोत. भविष्यात असल्या प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार शुद्धीवर कधी येणार? असा सवालदेखील त्यांनी शासनाला विचारला आहे. यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीच्यावतीने आरोपी अक्षय शिंदे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करून राज्य सरकारकडे आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.