रौनक दहियाने कांस्यपदक जिंकले
। अम्मान । वृत्तसंस्था ।
जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी (दि.20) भारताने पहिले पदक जिंकले आहे. युवा कुस्तीपटू रौनक दहियाने ग्रीको-रोमन 110 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत रौनकने तुर्कियेच्या इमरुल्ला कॅपकनचा 6-1 असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत रौनकला हंगेरीच्या झोल्टन जाकोकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला होता. तर, युक्रेनच्या इव्हान यांकोव्स्कीने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने अंतिम सामन्यात झोल्टन जॅकोचा 13-4 असा पराभव केला.
तसेच, साईनाथ पारधी हा भारतातील आणखी एक ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे, जो कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. 51 किलो वजनी गटात रिपेचेज फेरीत त्याचा मुकाबला अमेरिकेच्या मुन्नारेटो डोमिनिक मायकलशी होणार आहे. जर त्याने मुनारेटोला पराभूत केले तर कांस्यपदकासाठी त्याला आर्मेनियाचा सार्गिस हारुत्युन्यान आणि जॉर्जियाचा युरी चॅपिडझे यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागणार आहे.
रौनक दहियाचा प्रवास
दिल्लीच्या प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या रौनक दहियाने आपल्या चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात आर्टूर मानवेलयानवर 8-1 असा विजय मिळवून केली. यानंतर रौनकने डॅनियल मास्लाकोवर तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. मात्र, उपांत्य फेरीचा सामना गमावल्यामुळे तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.