शाळेला दांडी मारल्याने शिक्षकांचा अनोखा उपक्रम

| पाताळगंगा | वार्ताहर |

पूर्वी शाळेत एखाद्या विद्यार्थी आला नाही, तर गुरुजी अन्य विद्यार्थ्यांना सांगायचे की, जा त्याला शाळेत घेऊन या. त्यानतंर दोन-चार जण त्या विद्यार्थ्याला उचलून शाळेत आणायची. असाच प्रकार येथील रायगड जिल्हा परिषदेच्या वडगाव शाळेत घडला. इयत्ता चौथीमध्ये शिकणारा धनराज कोंडीलकरने शाळेला दांडी मारली. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक धनराजच्या घरी गेले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तेथेच शिकवण्यास सुरुवात करत अनोखी शक्कल लढवली. या प्रकारामुळे धनराजने आता कधीच शाळेला दांडी मारणार नाही, असे सांगितले.

मज आवडते मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा… आज खऱ्या अर्थाने मराठी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले काम कौतुकास्पद मानले जात आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरु असताना विद्यार्थी शाळेला दांडी मारण्याचे प्रकार वाढले आहेत. धनराजने शाळेला दांडी मारल्याचे अनुकरण अन्य विद्यार्थ्यांनी करु नये, यासाठी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धनराजच्या घरी सर्व विद्यार्थ्यांनी जावून अभ्यास केला.

खाजगी शाळेमध्ये एखादा विद्यार्थी शाळेत गेला नाही, तर शिक्षक त्यांच्या पालकांना फोन करून विचारतात, मात्र मराठी शाळेतील शिक्षक मुलांच्या घरी जावून वस्तूस्थिती जाणून घेतात आणी त्या मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी आग्रह करतात. हे फक्त मराठी शाळेत घडू शकते. मुलांच्यामध्ये बदल घडविण्यांची ताकत शिक्षकांमध्ये असून त्या मुलांमध्ये सकारात्मक उर्जा प्रदान करत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. दरम्यान, वाढत्या खासगी शाळांमुळे राजिपच्या शाळेत पटसंख्या कमी होत आहे. पटसंख्या कमी झाली तर ती शाळा बंद करण्यात येते. शाळा बंद झाल्याने तेथील शिक्षक हे अतिरीक्त ठरतात. अशा शिक्षकांचे समावेशन करताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version