| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक ही एक वेगळ्या पध्दतीने लढविली आहे. याचे सर्व श्रेय संतोष मोरे यांना जात आहे. रेवदंड्यातील शेकाप, महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनीदेखील या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक विजयाचा दिवस आहे. रेवदंडाकरांनी शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्याबरोबरच पुनर्जिवीत करण्याचे काम केले आहे. तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष मोरे यांचा मंगळवारी (दि.2) बहुमतांनी विजय झाला. यानिमित्ताने रेवदंड्यामध्ये गुरुवारी (दि.4) विजयाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अनिल पाटील, सुरेश खोत, शरद वरसोलकर, दादा मोरे, सोनाली मोरे, आदी शेकापसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत पराजय झाला. मात्र, या पराजयानंतर कार्यकर्ते डगमगले नाही. पुन्हा नव्या उमेदीने कार्यकर्ते कामाला लागले. शेतकरी कामगार पक्षाला जय-पराजय नवीन नाही. शेतकरी कामगार पक्ष हा संघर्षातून निर्माण होऊन पुन्हा उभा राहणारा आहे. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना ठेचून काढायचे आहे. उपसरपंच पदाच्या निवडणूकीनंतर शेतकरी कामगार पक्षाला एक नवी उर्जा मिळाली आहे. रेवदंडाकरांनी पुनर्जिवीत करण्याचे काम केले आहे. रेवदंड्यातील कायापालट हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाला आहे. ज्यांना स्वतःचे नाव वाचता येत नाही, तो सरपंच आहे, हे रेवदंडाकरांचे दुर्देव आहे. मात्र, आगामी काळात सरपंचदेखील शेकाप महाविकास आघाडीचाच असेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
संतोष मोरे यांच्या रुपाने एक चांगला उपसरपंच मिळाला आहे. सतत लढत राहिल्यामुळे आजचा हा ऐतिहासिक विजय पहावयास मिळाला आहे. हा सन्मान खऱ्या अर्थाने रेवदंडाकरांचा आहे. संतोष मोरे यांच्या रुपाने ही लढाई जावळीच्या वाघाने लढली आहे, असे गौरवोद्गार काढत, निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. ही फौज घेऊन कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या उमेदीने कामाला लागायचे आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. तालुक्यात शासकीय निधीची प्रचंड लयलुट सुरु आहे. टक्केवारीशिवाय काम केले जात नाही. हा प्रकार मोडीत काढण्यासाठी रेवदंड्याप्रमाणे निवडणूक लढल्यास तालुक्यामध्ये वेगळ्या पध्दतीने राजकीय वातावरणात बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच हा विजय अलिबाग तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा असून या विजयाने नव संजीवनी मिळाली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, तालुका शेतकरी संघटनाचे प्रमुख अनिल पाटील, नवनिर्वाचित उपसरपंच संतोष मोरे आणि ॲड. परेश देशमुख यांनीदेखील मार्गदर्शन केले.
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
