भारतीय संघाचे मराठमोळं स्वागत

मरठीत भाषण करत जिंकली मनं

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यानंतर भारतीय संघाचे जोरदार कौतुक होत आहे. हे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (दि.4) मायदेशी परतला. मायदेशी परतल्यानंतर गुरुवारी दिल्ली आणि मुंबई येथे भारतीय संघाचा मोठा गौरव करण्यात आला. यानंतर आता शुक्रवारी महाराष्ट्र शासनाकडून टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा मराठमोळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या क्रिकेटपटूंचा समावेश होता. याबरोबरच भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही गौरव करण्यात आला.


भारतीय संघातील महाराष्ट्राचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य यांचा आधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर हे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य विधानसभेसाठी रवाना झाले. महाराष्ट्र शासनाकडून चारही खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटीचे बक्षीसही देण्यात आले आहे. विधान भवनातही या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे स्वागत ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने करण्यात आले. यानंतर जेव्हा विधान सभेत या खेळाडूंचे आगमन झाले, त्यावेळी संपूर्ण विधानसभेत रोहितच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणाही देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी सर्व नेते आपापसातील भांडण विसरून खेळाडूंना समर्थन देताना दिसला. यावेळी विधान सभेत रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मराठीत भाषण करत सर्वांची मनंही जिंकली.

रोहितचे मराठीत भाषण
यावेळी सूर्यकुमार यादव अन्‌‍‍ रोहित शर्माने मराठीतून भाषण केले. रोहित शर्मा ज्यावेळी भाषण करण्यासाठी आला त्यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकांकडून 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा देण्यात आल्या. रोहितने आपल्या भाषणाची सुरूवात सर्वांना माझा मोठा नमस्कार असे म्हणत केली. त्यानंतर रोहितने विधान भवनात आमंत्रित करत सत्कार केला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे आभार मानले. रोहित म्हणाला की, सीएम साहेबांनी सांगितले की असा कार्यक्रम यापूर्वी विधान भवनात झाला नाही. आमच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला हे पाहून आम्हाला देखील भरपूर आनंद झाला. आम्ही 11 वर्षे विश्वचषकाची वाट पाहत होतो. मी सर्व संघाचे आभार मानतो. रोहित पुढे म्हणला की, हे माझ्यामुळे किंवा सूर्या, दुबे किंवा यशस्वीमुळे झालेले नाही. तर संपूर्ण संघाचे हे यश आहे. त्यानंतर रोहितने सूर्याची देखील खेचली. रोहित शर्मा सूर्यकुमारच्या ऐतिहासिक झेलचा उल्लेख करत म्हणाला की, सूर्या म्हणाला की तो चेंडू माझ्या हातात येऊन बसला. मी म्हणतो बरं झालं सूर्याच्या हातात चेंडू बसला नाहीतर मी सूर्यालाच बसवलं असतं. अखेर रोहित शर्माने आपले भाषण जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत संपवले.
Exit mobile version