भारतीय संघाच्या बांधणीचे लक्ष्य
| नवी दिल्ली | वार्ताहर |
बीसीसीआयला अखेर एक सक्षम आणि टी 20 क्रिकेट खेळलेला निवड समिती अध्यक्ष मिळाला आहे. माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरची भारतीय वरिष्ठ पुरूष संघाचे निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय संघ अनेक क्रिकेट फॉरमॅटमध्ये संक्रमणाच्या काळाचा सामना करणार आहे. अशा स्थितीत अजित आगरकर निवडसमिती अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे अजित आगरकर अध्यक्षपद भूषवत असलेल्या निवडसमितीवर एक मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे. संघ निवडीची मुख्य किल्ली आता अजित आगरकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
पगारात 200 टक्के वाढ
आगरकर पगारात तब्बल 200 टक्के हाईक घेत निवडसमिती अध्यक्षपदी विराजमान झाला. बीसीसीआयने निवडसमिती अध्यक्षपदाच्या वार्षिक पगारात तब्बल तीनपट वाढ केली. आता अजित आगरकला 1 कोटी नाही तर 3 कोटी रूपये मिळणार आहे. आगरकरने निवडसमिती अध्यक्षाचा पगार तिपटीने वाढवला खरा मात्र त्याच्यावर आता पगाराप्रमाणेच मोठी जबाबदारी असणार आहे.
सर्वात महत्वाचे काम म्हणजे भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार्या एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा संघ निवडणे हे असणार आहे. भारताने गेल्या 10 वर्षात एकदाही आयसीसी चषक जिंकलेला नाही. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता.
कसोटी संघातही मोठे बदल
भारतीय कसोटी संघाने सलग दोनवेळा विश्व कसोटीसाठी अंतिम फेरी गाठली. मात्र दोन्ही वेळा भारतीय संघाला ती गदा पटकावण्याचा काही मान मिळाला नाही. आता अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीवर 2023 ते 2025 पर्यंतच्या विश्व कसोटी स्पर्धेसाठी भारतीय कसोटी संघ तयार करण्याचे आव्हान असणार आहे. हा संघ तयार करताना संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या सारख्या वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. विशेष म्हणजे रोहितनंतर संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हा देखील मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
जुनी खोडं राहणार की जाणार?
भारतीय संघ 2024 ला टी 20 विश्वचषकाला सामोरा जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन हे टी 20 साठी कंबर कसेल. यावेळी निवडसमितीला भारतीय टी 20 संघाचा पारंपरिक चेहरा बदलण्याचे आव्हान असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळवायचा की त्यांना नाराळ देऊन नवे गडी नवे राज्य म्हणत संघात युवा खेळाडूंना स्थान द्यायचं हे देखील अजित आगकरच्या निवडसमितीला घ्यावा लागणार आहे.
सध्या टी 20 मालिकेदरम्यान विश्रांती घेणार्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला नारळ देण्याचा निर्णय झालाच. तर अजित आगरकरच्या निवडसमितीला हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचे कर्णधारपद कायमचे देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागले. याचबरोबर रोहित या विश्वचषकानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार की नाही याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. रोहितचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याकडेच वनडे कर्णधारपद द्यायचं की प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमायचं याचाही निर्णय घ्यावा लागेल.