| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना चक्क पाण्याच्या बाटल्या विकत आणून अंतिम विधी करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली. या ढिसाळ कारभारामुळे मृतकांच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीत एकाच वेळी दोन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते; मात्र, तिथे पाणीच नव्हते. नातेवाईकांनी तात्काळ पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी आणि टँकरसाठी संपर्क साधला, परंतु वेळेत टँकरही उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर नाईलाजास्तव नातेवाईकांनी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणून विधी पूर्ण केला. या घटनेनंतर नागरिकांनी पालिकेवर जोरदार टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने आधी पाच मृतदेह आल्यामुळे 500 लिटर पाणी संपले, असे कारण पुढे केले होते. मात्र, कर्मचाऱ्याने दिलेले हे कारण चुकीचे असल्याचे सांगत पालिकेने ते फेटाळून लावले.
स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेबाबत ठेकेदाराने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच जागृत राहायला हवे होते, असे सांगत पालिकेने संबंधित ठेकेदाराला कडक सूचना दिल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, येथील 500 लिटरची जुनी टाकी हटवून आता 2000 लिटर क्षमतेची नवीन टाकी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 2000 लिटरची टाकी भविष्यात पुरेशी राहील आणि नागरिकांची गैरसोय टळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अमरधाम स्मशानभूमीत बसणार टाकी
