मोटारसायकलस्वारामुळे 50 प्रवाशांचे प्राण बचावले
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड आगाराच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुरुड-बोरीवली रातराणी एसटी सेवेतील गंभीर निष्काळजीपणा समोर आला असून, धावत्या बसचे डाव्या बाजूचे मागील चाक अचानक निखळल्याने मोठा अपघात टळला. ही थरारक घटना रविवारी रात्री अलिबाग तालुक्यातील कुरूळ परिसरात घडली. सुदैवाने पाठीमागून येणाऱ्या एका सतर्क मोटारसायकलस्वाराने वेळेत इशारा दिल्याने तब्बल 50 प्रवाशांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड आगारातून 22 मे 2026 रोजी सुरू करण्यात आलेली मुरुड-बोरीवली रातराणी सेवा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुरुडहून बोरीवलीकडे रवाना झाली होती. ही बस कुरूळ परिसरात पोहोचताच मागील डाव्या बाजूच्या चाकाचे आठही नट निघून चाक पूर्णपणे वेगळे झाले. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराच्या लक्षात हा प्रकार आला. प्रसंगावधान राखत त्याने तातडीने बसचालकाला गाठून चाक निखळल्याची माहिती दिली. चालकाने तात्काळ बस थांबवल्याने संभाव्य भीषण अपघात टळला. रात्रीची वेळ आणि वेगात धावणारी बस पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे मुरुड आगाराच्या बस देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, याच कुरूळ परिसरात मुरुड आगाराच्या बसचे चाक निखळण्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगारातील बसेसचे मेंटेनन्स व्यवस्थित होत नसल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर मुरुड आगार व्यवस्थापकांच्या कामकाजावर संताप व्यक्त होत असून, “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करून सक्षम आगार प्रमुख नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कुरूळ परिसरातील दुसरी घटना
मुरुड आगाराच्या एसटी बसचे चाक निखळण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही याच परिसरात अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे एसटीच्या तांत्रिक तपासणी आणि देखभालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जितेंद्र मुंबईकर,
मी स्वतः त्या गाडीत प्रवास करत होतो. कुरूळच्या अलीकडे एक मोटारसायकलस्वार मागून येत चालकाला सतत इशारा देत होता. त्याने गाडीचे चाक निखळल्याचे सांगितल्यावर चालकाने बस थांबवली. त्या मोटारसायकलस्वारामुळेच आम्हा सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. तो आमच्यासाठी देवदूतच ठरला.
प्रवासी
