शेतकर्‍यावर रानडुकराचा हल्ला

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यातील पाचांबे नेरदवाडी येथील संतोष महादेव सावंत (46) हे शेतात कुंपण घालण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने हल्ला केल्याने त्यात सावंत हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

संतोष सावंत त्यांच्या घरानजीक असलेल्या शेतात रानटी प्राणी येऊन शेताची नासधूस करत असल्याने 16 ऑगस्ट रोजी सकाळी शेताला कुंपण घालण्यासाठी गेले होते. कुंपण घालत असता दुपारी 1 च्या सुमारास अचानक समोरून येत रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात संतोष यांच्या डाव्या पायाच्या मांडीमध्ये डुकराचा सुळा घुसल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. मात्र, डुकराने परत हल्ला चढवला. यानंतर डुकराने पळ काढला. या हल्ल्यात संतोष यांच्या उजव्या बाजूला मुका मार लागला तर उजव्या बगलेत मोठी जखम झाली आहे. संतोष यांना ग्रामस्थांनी तत्काळ संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Exit mobile version