| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात अनेक मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाल आहे. अनेकदा शासन दरबारी मागणी करुनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. याच दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा रुग्णांची हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार कुर्डुस ग्रामपंचायत हद्दीतील गारभाट खुटगाईन या अदिवासी वस्तीत घडला. कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील गारभाट आदिवासी वस्तीतील यशोदा गणपत केवारी या महिलेने भर रस्त्यात बाळाला जन्म दिला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे तिला वाटेतच वेदना सुरु झाल्या. खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालय गाठणे तिच्यासाठी अशक्य होते. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावात रस्ता नसल्यामुळे आरोग्य केंद्रात पायपीट करत जात असतानाच रस्त्यातच अतिशय लाजिरवाण्या परिस्थितीत या महिलेला आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेने प्रशासन तसेच आरोग्य खात्याचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आदिवासी वाडीतील महिलेला प्रसूती कळा लागल्याने तिचे नातेवाईक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. वेदना असह्य झाल्याने गर्भवती महिला रस्त्यावरच आडवी झाली. नातलग भांबावले. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. रस्त्यातच महिलेची प्रसूती करावी लागली. यावेळी संतप्त महिलेच्या कुटुंबीयांनी पंचायत व आरोग्य विभागाला याबाबत जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी सदर महिलेवर सातव्या महिन्यापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात असल्याची माहिती दिली. तिची प्रसुतीची वेळ नंतर होती. मात्र वेळे आधीच तिची प्रसूती झाली. त्या वाडीवर रुग्णवाहिका जाण्यास रस्ता नसल्याने तिला छोट्या टेंम्पोतून आणले. सध्या तिच्यावर योग्य ते उपचार केले जात असल्याचेही डॉ. मनीषा विखे यांनी सांगितले.