सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी स्वररत्न पुरस्काराने सन्मानित
पनवेल | साहिल रेळेकर |
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वरमंदिर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सेवा प्रतिष्ठानचा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पनवेल शहरातील जेष्ठ नागरिक संघ सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार विश्वास जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे मुख्य विश्वस्त गुरुवर्य पंडित बी ए तुपे गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात शास्त्रीय गायन सादर केले. तर मध्यंतरानंतर दुसऱ्या सत्रात उपशास्त्रीय व सुगम संगीताची बहारदार मैफल पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दीपप्रज्वलन व सरस्वतीपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करून इशस्तवनाने सांगितिक मैफिलीला सुरुवात झाली. यावेळी जेष्ठ शास्त्रीय गायक-नाट्यकर्मी चंद्रकांत कोळी, सुमित्रा सामंत, एम ए संगीत पदवीधर रवींद्र जाधव, शास्त्रीय गायक प्रेमनाथ पाटील यांनी शास्त्रीय संगीतातील विविध पैलू सादर केले. विद्यार्थ्यांच्या गायनाला सुप्रसिद्ध वादक कलाकार किरण यादव, कुशल डावरे, जयंता बगाडे व निलेश ठाकूर यांनी साथ दिली.
यावर्षीपासून संस्थेतील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या धर्तीवर संस्थेतील हरिदास महाले, रवींद्र जाधव, श्रद्धा माळी व ऍड.सुरेखा भुजबळ या विद्यार्थ्यांना ङ्गस्वररत्न पुरस्कार 2023फने गौरविण्यात आले. तसेच यापुढेही संस्थेच्यावतीने संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी गौरविण्यात येणार असल्याचे विश्वस्त पार्श्वगायक जितेंद्र तुपे यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संस्थेचे मुख्य विश्वस्त गुरुवर्य पंडित बी ए तुपे गुरुजींचा गुरूपूजन सोहळा साजरा करून आशिर्वाद घेतले. याप्रसंगी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायक, वादक आदी कलाकार मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पार्श्वगायक उदेश उमप यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे पार्श्वगायक नंदेश उमप, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज, आजी-माजी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.