अरे बापरे! चालत्या बसमध्येच महिलेची प्रसूती

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे धोका टळला

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते महाडदरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेने चालत्या एसटीतच बाळाला जन्म दिला. एसटी कर्मचारी आणि कोलाड आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने गर्भवती महिलेला तात्काळ सुविधा मिळाल्या. त्यामुळे महिला आणि बाळ सुखरुप आहेत. दोघांनाही अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, पेण-वडखळ येथून कोलाड-महाडकडे गरोदर महिला सुशिला रवि पवार (32) रा. रुद्रोली ही पनवेल ते महाड एसटीने (एमएच-14-बीटी-2632) प्रवास करीत होती. बस कोलाडनजीकच्या पुई महिसदरा पुलावर आली असता पुलावर प्रचंड पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे गचके खात कोलाडकडे येत असताना अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले व तिला प्रसूतीकळा सुरु झाल्या. दरम्यान, ही बाब लक्षात येताच एसटी चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधानाने एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत त्या महिलेला सादरच्या रुग्णालयात आणले.

या केंद्रातील डॉ व्ही.बी. टिवडे व डॉ. एम एस. वाघ यांच्या प्रयत्नाने उपचार करुन त्या महिलेची सुखरूप प्रसूतीसाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी तांबे नर्स व लक्ष्मण होगाडे यांनी ही महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, महिला सुखरूप असून, बाळाचे वजन घटल्याने ते थोडे चिंताजनक असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यास अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

उघडा डोळे, बघा नीट
एसटीचे चालक गोविंद जाधव व वाहक नामदेव पवार यांनी प्रसांगवधान दाखवत वेळेवर महिलेला आंबेवाडी येथील शासकीय रुग्णालयात आणून मोलाचे सहकार्य केले व महिलेची या संकटातून सुखरूप सुटका झाली. परंतु, या खड्ड्यांचे काय? आता तरी उघडा डोळे बघा नीट, असा संताप नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध व्यक्त केला आहे.
Exit mobile version