लैंगिक अत्याचार करून पैसेही लुबाडले
| पनवेल | वार्ताहर |
लग्न जुळवणाऱ्या साईटवर घटस्फोटित असल्याची माहिती देऊन पनवेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने अलिबाग परिसरात राहणाऱ्या एका महिलेला लग्नाची मागणी घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे या व्यक्तीने पीडित महिलेची आर्थिक व भावनिक फसवणूक केल्याचे देखील उघडकीस आले. रोहन चिंतामण शिंदे (38) असे त्याचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
रोहन शिंदे याने या लग्न जुळवणाऱ्या साईटच्या माध्यमातून पीडित महिलेच्या प्रोफाईलवर संपर्क साधत गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या चार महिन्यात पनवेलमधील दोन लॉजमध्ये नेऊन तसेच, तिच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. या कालावधीत त्याने पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये लोन अॅप डाउनलोड करून तिच्या नावावर परस्पर कर्ज घेतले, एवढेच नव्हेतर सिनेमागृहात चित्रपट पाहत असताना तिच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर रोहन याने त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेतला नसल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले असता तिने खांदेश्वर पोलीस ठाण्यात रोहनविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्ह्याचे घटनास्थळ पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने त्यांनी हा गुन्हा पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.






