| नवी मुंबई | प्रतिनिधी |
महसूल विभागात लिपिक पदावर नोकरी लावून देतो, असे प्रलोभन दाखवून एका व्यक्तीने घणसोलीतील एका सुशिक्षित महिलेची 2 लाख 10 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीप उत्तम महाले याने स्वत:ला मंत्रालयातील अधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केली आहे. सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुजीत पाटील हा त्याच्या पत्नीसाठी नोकरीच्या शोधात होता. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्या एका नातेवाइकामार्फत त्याची ओळख पनवेलमधील आदई गावात राहणाऱ्या संदीप महाले याच्याशी झाली होती. त्या वेळी महाले याने मंत्रालयात महसूल विभागात कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. तसेच सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये लिपिक पदाची जागा रिक्त असून, त्या जागेवर सुजीतच्या पत्नीला नोकरीला लावून देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास संपादन करण्यासाठी महाले याने सुजीतची पत्नी आणि चुलत भावाला कोकण भवन येथे भेटायला बोलावले. तिथे त्याने कागदपत्रांची पडताळणी करण्याचे नाटक केले आणि 10 मिनिटे कार्यालयात जाऊन आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. डीडी काढण्याच्या नावाखाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने मंत्रालयातील साहेबांना देण्यासाठी म्हणून त्याने एकूण 2 लाख 10 हजार रुपये उकळले. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही नोकरी मिळत नसल्याने पाटील कुटुंबीयांनी महालेच्या पाठीमागे पैशांसाठी तगादा लावला असता, त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याच्या घरी जाऊन विचारणा केल्यानंतर त्याने 2 लाख 50 हजारांचा धनादेश दिला. मात्र, तो बँकेत न टाकण्याची विनंती केली. कालांतराने त्याने आपला मोबाईल बंद केला आणि राहते घर सोडून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुजीत पाटील याने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सरकारी नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
