| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात 29 वर्षीय महिलेवर दोघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती. पीडित महिला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात 22 सप्टेंबर रोजी संबंधित महिला एकटी होती. यावेळी दोघा जणांनी तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीनुसार सीएसएमटी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. सीएसएमटी परिसरात महिला एकटीच उभी असताना दोघा अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर झडप घातली. तिने आरडाओरड करु नये म्हणून एकाने तिचे तोंड दाबून दोघांनी तिला निर्जन स्थळी नेल्याचा आरोप आहे. तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे. नवी मुंबईतील मीनाताई ठाकरे रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







