नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या महिलेला शिक्षा

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासन घरकुल विभागाची अध्यक्षा असल्याचे भासवून तहसील कार्यालयात नोकरीला लावण्याचे आमिष दाखविणाऱ्या महिलेला दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस. कोकाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

मंगळ उर्फ विमल मोरे असे या फसविणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची सातारा जिल्ह्यातील असून, सध्या वेश्वी येथे राहात होती. पोयनाड परिसरातील नागझरी येथील नरेंद्र चंद्रकांत जाधव या व्यक्तीची विमल मोरे सोबत ओळख झाली. महाराष्ट्र शासन घरकुल विभागाच्या अध्यक्षा असून, मी अनेकांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देते, असे जाधवला सांगितले. तसेच त्याला तहसील कार्यालयात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून 40 हजार रुपये घेतले. मात्र, अनेक महिने होत आले तरीही नोकरी न मिळाल्याने जाधवने विमलला विचारणा केली. तेव्हा तिच्याकडू उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस हवालदार डी.व्ही. जाधव यांनी तपास करून विमल मोरेविरोधात गुन्हा दाखल करून तिच्याविरोधात अलिबाग येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. पोलिसांनी केलेला तपास व न्यायालयात सादर केलेले पुरावे याचा विचार करीत न्यायालयाने मंगल उर्फ विमल रवि मोरे हिला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे नईमा घट्टे यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार गणेश पवार व पोलीस हवालदार राजेश नाईक यांनी सहकार्य केले.

Exit mobile version